अमेरिकेतील माझा पहिला नाट्यानुभव



सगळे प्रेक्षक ज्याची उत्कंठापूर्वक  वाट पाहत होते त्या जगातील सर्वात सामर्थ्यवान माणसाचे स्टेजवर आगमन झाले. पांढरा शुभ्र भारतीय सदरा व खाली फेड झालेली लीव्हाय ची जीन ची पेंट अश्या एकदम इन्फ़ोर्मल कपड्यामध्ये तो माणूस झपाझप पावले टाकीत माईक पाशी पोहोचला. नेहमीचे चमकदार स्मित करून मिस्टर बराक ओबामा यांनी शुध्द मराठी भाषेत भाषणास सुरवात केली. सर्व प्रेक्षक लक्षपूर्वक व मन लावून ओबामा यांच्या भाषणामध्ये रमून गेले. अखेर मी ज्याची कधीपासून वाट पाहत होतो तो क्षण आला.

“श्री निरंजन ओक यांना इन्फोर्मेशन टेक्नोलोजी ह्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. श्री निरंजन ओक यांनी कृपया स्टेज वर यावे”

आधीच फुगलेले माझे शरीर अभिमानाने आणखीनच फुगले. मी बाजूला बसलेल्या शीतलकडे म्हणजे माझ्या बायको कडे अभिमानाने दृष्टीक्षेप टाकला.

“अहो उठा…” शीतल माझ्या कानात पुटपुटली.

पण मी तर आधीच उठलेलो होतो. मला कळेना बायको असे का म्हणते आहे.

“अहो आता उठा…” शीतल जवळजवळ किंचाळलीच.

“म्हणून सांगत होते दुपारच्या वेळी पुरण पोळ्या खावून झोपत जाऊ नका म्हणून. पण तुम्ही ऐकाल तर ना” बायकोची फूस फूस सुरूच होती.

अखेर मी पांघरूण झटकून उठलो. काय मस्त हेपनिंग स्वप्न होते! मनात विचार आला कि अमेरिकेत आल्यापासून  माझ्या आयुष्यात सगळ्या हेपनिंग गोष्टी फक्त स्वप्नातच का घडाव्यात? येथे सगळ्या गोष्टी अत्यंत शिस्तबध्द. कधी गाड्या बंद पडत नाहीत ट्राफिक ची बोंबाबोंब नाही रस्त्यांना खड्डे पडत नाहीत कुठेही गर्दी गोंधळ नाही. न्यूयॉर्क बंद किंवा ऑस्टिन बंद किंवा कुठल्याही प्रकारचे बंद किंवा संप नाहीत. श्या! काही हेपनिंग घडतच नाही.

बायकोनी केलेल्या कडक चहाचा घोट घश्याखाली गेल्यावर पुरण पोळ्यांमुळे आलेली सुस्ती उतरली आणि मनाला थोडीशी तेर्तरि आली.

“अहो तुम्हाला सांगायची विसरले. दुपारी माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. ती म्हणत होती की ह्या वर्शी ऑस्टिन मराठी मंडळाच्या कार्यक्रमाला ते एक फार्सिकल नाटक बसवणार आहेत म्हणे…” शीतलनी गरमागरम पोह्याची बशी माझ्या हातात देत ताजी बातमी दिली.

“बर मग?” पोह्याचा बकाणा भरत मी निर्विकारपणे विचारले.

“ती विचारात होती कि तुम्ही नाटकात काम करण्याकरता इंटरेस्टेड आहात का?” मी अवाक! माझा आणि ह्या बातमीचा काही संबंध असेल असे मी स्वप्नात सुद्धा इमेजिन केले न्हवते. मी आणि मराठी नाटकं ह्यामध्ये पूर्वापार चालत आलेला एक अलिखित करार होता. लोकांनी नाटकं करायची व मी ती छानपणे प्रेक्षकांमध्ये बसून एन्जॉय करायची. त्याचं काय आहे की तेंडुलकर ची बेटींग बघणे आणि स्वतः तेंडूलकर सारखी बेटींग करणे ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे कि नाही? माझे आजोबा नेहमी म्हणायचे जेणो काम तेणो ठाय बिजा करे सो गोता खाय!  मी बायकोला नाही म्हणणारच होतो तेवढ्यात माझ्या मनामध्ये एक विचार चमकून गेला. आपण रोजचे ऑफिस घर घर ऑफिस असे रुटीन करून करून बोर झालेलो असतो. जसे त्या टी व्ही वरील सिरिअल मध्ये दाखवतात तसे आपल्याही जीवनात काही तरी इंटरेस्टिंग घडत राहावे असे आपल्याला वाटत असते. पण आपण आपल्या कोशात स्वतःला बंदिस्त करून ठेवलेले असते. जरका तो कोश थोडासा किलकिला करून उघडला तर? फार नाही पण थोडेसे काही वेगळे करून बघितले तर? का नाही? पूर्वजन्मात माहित नाही पण ह्या जन्मात मी कधीही नाटकांत काम केले नव्हते पण जरका ट्राय करून बघितले तर? नाहीतरी थोर विचारवंत वामनराव पै म्हणालेच आहेत की “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. झालं तर! माझ्या मनात विचार पक्का झाला.
“हो मी तयार आहे” उरलेल्या पोह्यांचा समाचार घेत मी आनंदानी सांगितले.
बघता बघता तो दिवस आला. आम्ही सगळे देवाघरी गेलो. अहो घाबरू नका. देवाघरी म्हणजे आमचे फेमिली फ्रेंड श्री देव आहेत ना त्यांच्या घरी गेलो. आमच्या सौ. च्या माहिती प्रमाणे त्यांच्या घरी नाटका विषयी पहिली मिटिंग होती व जवळ जवळ दहा ते पंधरा फेमिलीज ना बोलाविलेले होते. आमची फेमिली त्यापैकीच एक. बाकीच्या फेमिलीन्पैकी बर्याच लोकांची नावे मी शीतल च्या तोंडून ऐकलेली होती पण प्रत्यक्षात कधी त्या लोकांना भेटण्याचा योग आला नव्हता. एक तर अमेरिकेत मराठी माणसे कमीच त्यामुळे नाटकाच्या निमित्ताने का होईना पण बर्याच नवीन लोकांशी ओळख होणार या भावनेनी मी सुखावलो होतो. देवाघरी गेल्यावर अगदी अपेक्षेपेक्षाही मोठा सुखद धक्का बसला! माझा एक जुना मित्र कि ज्याला मी तेरा वर्षांपूर्वी केलिफोर्निया मध्ये भेटलो होतो तो चक्क तिथे भेटला. तेरा वर्षात त्याच्या केसांचे छप्पर उडालेले होते. माझे छप्पर जरी शाबूत असले तरी माझी वास्तू बरीच भव्य झालेली होती. पण तरीसुद्धा आम्ही एकमेकांना ओळखलेच. बाकीच्या फेमिलीन्पैकी सगळ्यांशी ओळख झाली. मला गंमत एका गोष्टीची वाटली कि माझ्याप्रमाणेच बरीच मंडळी नाटक ह्या क्षेत्राशी नवीन होती व नाटकाच्या निमित्ताने इतर मराठी भाषिक लोकांशी ओळखी व्हाव्यात व काहीतरी नवीन करायला मिळावे ह्या मताची होती. समविचारी लोकांशी गट्टी जमायला वेळ लागत नाही त्यामुळे थोड्याच वेळात आमच्या तारा जुळल्या.
चहा नाश्ता झाल्यावर ठरल्याप्रमाणे नाटकाचे वाचन सुरु झाले. नाटकाचे नाव होते “कसं रामायण असं रामायण”. नाटकाची थीम होती आजच्या मोबाईल युगातील रामायण. त्या नाटकातील संवाद वाचताना हसून हसून सगळ्यांची बोबडी वळली. एकंदरीत काय तर आम्ही सगळे त्या नाटकावर फिदा झालो. रात्री उशिरापर्यंत नाटकाचे वाचन, चर्चा आणि गप्पा चांगल्याच रंगल्या. हा हा म्हणता यातच तीन ते चार आठवडे उलटून गेले व अखेर प्रत्यक्ष तालमीला सुरवात झाली. आतापर्यंत मी माझे संवाद तोंडपाठ केलेले होते व क्लू मिळाल्यावर मी ते ठासून बोलून दाखवायचो पण आता प्रत्यक्ष पाण्यात उतरायची वेळ आली होती. नुसते डायलॉग म्हणायचे न्हवते तर त्याबरोबर आता अभिनय सुद्धा करून दाखवायचा होता. झालं तिकडेच माझी तंतरली. माझ्या अचानक लक्षात आले की ह्याबद्दल आपण कधीच खोलवर जाऊन विचार केलेला नाहीये. आता अभिनय हा जरका माझ्या इंजिनीरिंग शिक्षणातील विषय असता तर मला कमीतकमी थेअरी तरी माहित असती. पण जिथे थेअरिचिच बोंब तिथे प्रेकटीकल काय कप्पाळ येणार! आमच्यापैकी ज्यांना बर्यापैकी अभिनय जमत होता किंबहुना आपल्याला अभिनय जमतो असा ज्यांचा समज होता त्या लोकांनी भराभर सल्ल्यांचा भडीमार सुरु केला. उदाहरणार्थ “अरे तू डोक्यानी विचार करू नकोस तु ना मनानी त्या भूमिकेत शीर त्या भूमिकेशी एकरूप हो”. मला सगळे कळत होत व पटतही होत पण ही थेअरी होती. प्रत्यक्ष मनानी त्या भूमिकेत घुसायचे कसे? अरे ते काय एखादे दार आहे का कि उघडले आणि आत घुसले! बराच विचार केल्यावर मला अचानक एक साक्षात्कार झाला. लहानपणी माझ्याकडून क्रिकेटची बेटिंग करताना चुकून सोसायटीतील कोणाचीतरी काच फुटायची. पण जेव्हा ते काका रागानी टणतणत खाली यायचे तेव्हा मी अत्यंत निरागस भाव तोंडावर आणून त्यांना सांगायचो कि तो मी न्हवेच. तेव्हा जसा मी फूल कोन्फीडन्स मध्ये निरागसतेचा आव आणायचो अगदी तसेच त्याप्रमाणेच नाटकाच्या भूमिकेतील व्यक्तिरेखेचा आव आणायचा कि काम फत्ते! अखेर माझ्या डोक्यात उजेड पडला व मी घाबरत का होईना पण अभिनय ह्या नवीन प्रकाराशी दोस्ती करण्यास सुरवात केली.
असेच काही आठवडे गेले. नाटकाची भट्टी एकदम मस्त बसायला लागली होती. जसा जसा कार्यक्रमाचा दिवस जवळ येऊ लागला तसा तसा सगळ्यांचा उत्साह वाढायला लागला. आमच्या ऑस्टिन मराठी मंडळाच्या वेब साईट वर आमच्या नाटकाचा व्हिडीओ प्रीव्ह्यू सुद्धा प्रसिद्ध झाला. बर्याच लोकांकडून नाटकाच्या व्हिडीओ प्रीव्ह्यू बद्दल खूपच उत्साहवर्धक व खूपच छान प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या. अखेर एकदाचा कार्यक्रमाचा दिवस उजाडला. लोकांनी नाटक बघायला फुल्टू हजेरी लावली होती. सगळे थेटर भरलेले दिसत होते. नाही म्हटले तरी आमच्यापैकी बऱ्याच मंडळींचा स्टेजवरचा हा पहिलाच प्रगट दिन होता त्यामुळे उसने अवसान आणून एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरु होता. भीतीमुळे मांजराचे केस कसे ताठ उभे राहतात तसे आमचेही झाले होते, नशीब आपल्याला शेपटी नाही ते म्हणून वाचलो नाहीतर तीही ताठ उभी राहिली असती.
पण अखेर आमचा पहिला वहीला नाट्यप्रयोग एकदम यशस्वी झाला. ओर्केष्ट्रा मध्ये सगळी वादये वेगवेगळ्या लोकांच्या हातात असूनसुद्धा  कशी एकजीव होऊन वाजतात तसेच नाटक सादर करताना आम्हाला वाटले. आम्ही सगळे जण त्या वाद्यांसारखे एकमेकांबरोबर इतके मस्त ट्यून झालो होतो कि आमच्या प्रेक्षकांना एक विलक्षण नाट्यानुभव आम्ही देऊ शकलो.
पण मंडळी तुम्हाला म्हणून सांगतो कि आमच्यासारख्या हौशी कलाकारांना घेऊन परदेशात एवढे मोठे नाटक करायचे म्हणजे केवढी मोठी सर्कस आहे ह्याची पुरेपूर कल्पना असूनसुद्धा ह्या नाटकाचे लेखक श्री योगेश कुळकर्णी तसेच ह्या नाटकाचे दिग्दर्शक सौ रुपाली देव व श्री सुजीत पाटील यांनी ते करायचा चंग बांधला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हडे कमी आहे.
ह्या लेखाच्या निमित्ताने मला एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते कि अमेरिकेत तसेच अनेक देशात जिथे जिथे मराठी मंडळ आहेत तिथे तिथे ज्या लोकांनी मंडळाच्या कार्यक्रमातून मराठी लोकांच्या मनामनात अजूनही महाराष्ट्र जिवंत ठेवलेला आहे त्या सर्व लोकांना माझा सलाम.  


लेखक : निरंजन गोविंद ओक
आपल्या प्रतिक्रिया खालील इमेल वर अवश्य कळवा. 
email : ngoak_usa@yahoo.com