रंगमंच @ऑस्टिन



टण… टण… टण! नाटकाची तिसरी घंटा झाली आणि मी सेल फोन स्विच ऑफ करून खुर्चीत नीट सावरून बसलो. अमेरिकेत अनेक वर्षानंतर मी पहिल्यांदाच चक्क बारा डॉलर मोजून एक व्यावसायिक मराठी नाटक बघायला आलो होतो. मनात बर्याच गोष्टींचे वादळ सुरु होते. कारण ह्या नाटक मंडळींपैकी कोणाचेच नाव मी कधीच ऐकलेले नव्हते. ही मंडळी काही व्यावसायिक नाटक मंडळी नाहीत हे माहित होते. एव्हडेच ऐकिवात होते कि ऑस्टिन मधील काही यंग मंडळी एका चांगल्या हेतूनी प्रेरित होऊन पहिल्यांदाच एक नवीन व्यावसायिक स्वरूपाचा प्रयोग करीत आहेत.  त्यामुळे केवळ ऐकीव माहितीवर विश्वास ठेवून मी माझ्या काही मित्रांसमवेत “काका मला वाचवा” ह्या नाटकाला आलो होतो. जरका ह्या नाटकाने अपेक्षाभंग केला तर माझ्या आग्रहाखातर आलेले माझेच मित्र मला असे काही बडवतील कि मलाच “लोकहो मला वाचवा” असे म्हणत पळावे लागते कि काय अशी थोडीशी भीतीपण होती.  



रंगमंचावरील कलाविष्कार अनुभवण्याचा प्रसंग म्हणजे काहीसा विमान प्रवासासारखा असतो नाही? विमान प्रवासाचे काही प्रमुख टप्पे असतात. उदाहरणार्थ  टेक ऑफ, रिचिंग हाय अल्टीट्युड, क्रुझ आणि अखेर लेंडिंग. तसेच कलाविष्काराचेहि असते. तिसरी घंटा होते आणि प्रेक्षक ज्याची उत्सुकतेने वाट पाहत असतात ते नाटक सुरु होते (टेक ऑफ). नाटकाला पहिल्या काही मिनिटात प्रेक्षकांच्या मनात शिरून अपेक्षित उंची गाठणे गरजेचे असते. प्रेक्षकांचे आणि नाटकातील पात्रांचे ट्युनिंग जमण्याची हीच ती वेळ (रिचिंग हाय अल्टीट्युड). एकदाका प्रेक्षक नाटकाशी एकरूप झाले की त्यांच्या नकळत ते नाटकातील कलाकारांशी आपोआप संवाद साधू लागतात. हा संवाद शब्दरूपी नसून तो टाळ्या, प्रचंड हशा अश्या स्वरुपाचा असतो. प्रेक्षकांची योग्य वेळी दाद मिळायला लागणे हे नाटकाच्या यशश्विततेचे लक्षण असते त्यामुळे नाटक एक अंकी असो अथवा दोन अंकी पुढचा प्रवास एकदम क्रुझ कंट्रोल लावल्यासारखा स्मूथ होतो (क्रुझ). व अखेर येतो तो नाटकाचा क्लायमेक्स (लेंडिंग).

“काका मला वाचवा” ह्या नाटकाने हे चारही टप्पे अत्यंत यशस्वीततेनी हाताळले. नाटकाचा प्रयोग सुरु झाला आणि हा हा म्हणता त्या अफलातून विनोदी नाटकानी काही मिनिटातच सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. बघता बघता मी ह्या नाटकात कधी बुडून गेलो ते मला कळले देखील नाही. मंडळी तुम्हाला म्हणून सांगतो कि नाटक संपल्यावर जेव्हा भानावर आलो तेव्हा सर्वात पहिले मनात काय आले असेल तर “बॉस! पैसा वसूल”. मी तुम्हाला या नाटकाविषयी व ह्या नाटकाच्या स्टोरी विषयी काही सांगून त्यातील मजा घालवून टाकू इच्छित नाही. हे नाटक विनामूल्य यू-ट्यूब वर आपल्याला बघता येईल. व तुम्ही ते अवश्य बघा असे मला आवर्जून सांगावेसे वाटते (ह्या लेखाच्या शेवटी “काका मला वाचवा” ची लिंक तसेच हे नाटक ज्या “रंगमंच” नावाच्या ग्रुप नी सादर केले आहे त्यांची लिंक प्रसिद्ध केलेली आहे)



“काका मला वाचवा” ह्या नाटकाला आता बरेच महिने होऊन गेले होते. मी त्या नाटकामुळे “रंगमंच” ग्रुप वर ज्याम खुश होतो व त्यांचे फेसबुक पेज सुद्धा लाईक केले होते. दुसर्यांच्या जीवनात डोकावणे हा माणसाचा स्वभाव आहे कि नाही ते मला माहित नाही पण तो मराठी माणसाचा स्वभाव नक्कीच असावा असे मला माझ्या स्वभावावरून कधी कधी वाटते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी फेसबुक बघितल्याशिवाय म्हणजेच दुसर्यांच्या जीवनात डोकावल्याशिवाय चैन म्हणून पडत नाही. असेच एकदा फेसबुक वर “रंगमंच” ग्रुप चे पेज बघतांना मला आश्चर्याचा धक्काच बसला. रंगमंच ग्रुपची मंडळी चक्क एक नवीन हिंदी नाटक घेऊन येत आहेत अशी न्यूज त्यावर होती. हि मंडळी एक व्यावसायिक हिंदी नाटक करणार ह्यापेक्षा नवीन आणखी काय असू शकते नाही? मला ह्या गोष्टीचे खूप अप्रूप वाटले. हे बघून आनंद वाटला की आपली ऑस्टिन मधील मंडळी त्यांचे क्षितीज रुंदावत आहेत. त्यांना महत्त्वाकांक्षेचे पंख फुटले आहेत. पण त्याचबरोबर मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आता मराठी प्रेक्षक आणि हिंदी प्रेक्षक यांच्यात सर्वात मोठा फरक म्हणजे भाषेचा फरक. त्यानंतर नाही म्हटले तरी थोडासा कल्चर चा फरक. मला असे वाटते की आपण मराठी लोक जरा मृदू असतो आपल्या वागण्या बोलण्यात जास्त भपका नसतो. आपल्या याच स्वभावाप्रमाणे आपल्या नाटकाच्या आवडी निवडी ठरत असाव्यात. आपल्याला गोष्टीमधील भाव आवडतो तर बाकीच्या मंडळींना गोष्टीमधील आव आणि भडकपणा भावतो. हिंदी भाषेचे म्हणाल तर बर्याच वेळा तुम्ही बघितले असेलच कि जेव्हा एखादा अस्सल मराठी माणूस हिंदी बोलतो तेव्हा लगेचच कळून येते की हिंदी हि काही त्याची मातृभाषा नाही. त्यामुळे जेंव्हा तुम्ही अस्सल हिंदी प्रेक्षकांसमोर हिंदीतून नाटक करणार तेंव्हा अगदी अस्खलितपणे हिंदी बोलणे हे खूपच महत्वाचे ठरते. कसं काय बूवा ह्या लोकांना हे सगळे जमणार? अशी भाबडी शंका मनाला चाटून गेली. पण मी जेंव्हा रंगमंच ग्रूप चे हे हिंदी नाटक “किरदार” बघितले तेंव्हा माझ्या सगळ्या शंका मावळल्या. एकदम अफलातून नाटक! ह्या नाटकाने दिग्दर्शन, नेपथ्य, लाईटिंग, म्युजिक, मेकप या सगळ्या बाबतीत षटकार मारलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्या नाटकात मराठी कलाकारांनी हिंदी भाषेवर मिळवलेले प्रभुत्व आणि तेव्हड्याच कुशलतेने केलेला अप्रतिम अभिनय. व्वा! क्या बात है!

“किरदार” हे नाटक सायकोलोजिकल थ्रिलर ह्या केटेगिरी मध्ये बसू शकते. ह्या नाटकात पाच पात्रे आहेत. कथेमधील प्रमुख पात्राचे नाव आहे प्रथमेश दातार. संपूर्ण नाटक ह्या पात्राभोवती फिरत राहते. प्रथमेश दातार हे एक प्रसिद्ध लेखक असतात.
त्यांनी लिहिलेल्या रहस्यमय पुस्तकातील प्रसंगांसारखेच प्रसंग खरोखरच्या जीवनातील लोकांवर घडलेले असतात. त्यामुळे आता आपले बिंग फुटणार या भीतीने ती लोक प्रथमेशला भेटायला येउन हैराण करत असतात. प्रथमेश प्रचंड बुचकळ्यात पडतो त्याला कळत नाही की हा विलक्षण योगायोग आहे की कोणीतरी मुद्दामून त्याच्या विरुद्ध कट कारस्थान करीत आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या या नाटकात पुढे काय घडते हे तुम्हीच पहा. “हेल्युजिनेशन” म्हणजेच भास ह्या थीम वर हे नाटक आधारित असून ह्या नाटकाचा शेवट अत्यंत वेगळा व धक्कादायक आहे. हे नाटक यू-ट्यूब वर आपल्याला विनामूल्य  बघता येईल (ह्या लेखाच्या शेवटी “किरदार” ची यू-ट्यूब वरील लिंक आपल्याला मिळेल)
ह्या नाटकातील मला आवडलेली काही दृश्ये…
प्रथमेश दातार आणि डॉक्टरांची प्रथम भेट : ह्या दृश्यामध्ये डॉक्टर आणि प्रथमेश दातार हे स्टेजवर डावीकडील भागात बसलेले दाखविण्यात आलेले आहेत. स्पॉट लाईट फक्त त्यांच्यावर आहे व उजवीकडील स्टेजवर पूर्ण अंधार आहे. डॉक्टर जेव्हा प्रथमेशला त्याच्या अनुभवांबद्दल विचारतात तेव्हा डॉक्टरांशी त्या अनुभवाबद्दल बोलण्याकरिता तो उठतो काही शब्द बोलतो. स्टेजवरील डाव्या भागात त्यांच्यावरील स्पॉट लाईट ऑफ होतो आणि स्टेजची उजवी बाजू प्रकाशमान होते. प्रथमेश पटकन वळून त्या बाजूला येतो. तिथे कथेतील दुसरे पात्र म्हणजेच निशा राव अगोदरच उभी असते व प्रथमेश व निशाचे संवाद सुरु होतात. आता प्रक्षकांचे संपूर्ण लक्ष्य स्टेजवरील उजवीकडे घडत असलेल्या प्रथमेश आणि निशा यांच्या संवादाकडे लागते. हे लाईट इफेक्ट्स, निशाचे तिथे उपस्थित असणे आणि प्रथमेश चे पटकन वळून तिथे येणे हे इतके क्षणार्धात घडते की त्यामुळे प्रेक्षकांना  फ्लेश-बेक दाखविण्याचा इफेक्ट अगदी परफेक्ट साध्य होतो. आणि हे ही नसे थोडके बर का! तर जेव्हा निशा प्रथमेशला त्रास देते तेव्हा प्रथमेश आक्रोश करत पुन्हा फ्लेश बेक मधून डॉक्टरांकडे पळत येतो. तेव्हा तोच लाईट इफेक्ट पण फक्त रिव्हर्स ऑर्डरनी घडतो. ही फ्लेशबेक मध्ये जाऊन पुन्हा फ्लेशबेक मधून बाहेर यायची कल्पना, त्या दृष्टीने स्टेजचा व लाईटचा  केलेला योग्य वापर व या सर्व दृश्याचे अत्यंत काळजीपूर्वक केलेले नियोजन प्रचंड कौतुकास्पद आहे.
प्रथमेश दातार आणि अपूर्वा यांची प्रथम भेट : हा सीन नाटकाच्या सुरवातीलाच घडतो. नाटक थोडेसे सस्पेन्स व गूढ वातावरणात सुरु होते. थोड्याच वेळात अपूर्वा ह्या पात्राची एन्ट्री होते. प्रथमेश तिला बिलकुल ओळखू शकत नाही पण ती मात्र प्रथमेशशी चांगल्यापैकी ओळख असल्याचा दावा करते व प्रथमेशला तिच्या हातून झालेल्या खुनाची बरोबर माहिती असल्याचा आरोप करते. दोघांच्यामधील संवादातून कथानक आणखीनच गूढ रूप धारण करते व प्रेक्षक त्यांच्या नकळत नाटकात पूर्णपणे खेचला जातो. नाटक सुरु झाल्यावर थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या मनात घुसत जाते चढत जाते व अपेक्षेहूनही जास्त उंची पार करते. ह्या सीन मध्ये शेवटी आणखीन एक वेगळ्या प्रकारचा पंच आहे. मला तो जाणवला पण  तुम्हालाही तो तसाच जाणवला का ते नाटक बघून मला सांगा. ह्या सीन च्या शेवटी अपूर्वा ज्या प्रकारे चालत एक्झिट घेते ते बघायला अत्यंत गूढ वाटते. खूप वर्षांपूर्वी एक इंग्रजी सिनेमा आला होता “घोस्ट” नावाचा. त्यामध्ये जेव्हा व्हिलन मरतो व मेल्यावर त्याचा आत्मा आणि हिरोचा आत्मा यांची आता जुंपणार असे वाटते नेमके तेव्हाच कुठूनतरी सुक्ष्मातून काळे ढग येतात व व्हिलनला त्या सूक्ष्मात घेऊन जातात. हे जे सूक्ष्म अवकाश आपण ज्याला म्हणतो ना तेच. मग ते सूक्ष्म अवकाश म्हणजे प्रथमेशचे मन असो वा आणखी काही गुढरम्य. अपूर्वाची एक्झिट बघताना खरोखरच असे वाटते कि अपूर्वा त्या सूक्ष्मामधे अंतर्धान पावली आहे. तसा हा पंच छोटा आहे पण अश्याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाटक संपन्न होत जाते नाही का?
 
अरे बापरे! बघता बघता मी तुमचा बराच वेळ घेतला नाही? असो. तर सांगायचा मुद्दा असा की अशी अनेक दृश्ये आहेत कि जी मला सांगता येतील पण “किरदार” विषयी मी येथेच आटोपते घेतो. तुम्ही न चुकता “किरदार” हे नाटक अवश्य बघा (ह्या लेखाच्या शेवटी “किरदार” ची यू-ट्यूब वरील लिंक आपल्याला मिळेल)


बर. मंडळी तुम्ही विचाराल की “किरदार” हे नाटक होऊन आता बराच काळ लोटला. आता नवीन काय बातमी आहे? तुमचा तर्क अगदी बरोबर आहे. सध्या मला प्रचंड उत्सुकता लागली आहे ती रंगमंच च्या नवीन हिंदी नाटकाविषयी. आत्ताच मी फेसबुक वर त्यांच्या नवीन नाटकाचा “प्रोमो” बघितला. कोणी केला असेल हा प्रोमो? तर दस्तुरखुद्द माननीय सौ. सुहास जोशी.…अहो नाही…ह्या कोणी नाव-आडनाव भगिनी नसून स्वतः सुहास जोशीच हो! बसला कि नाही सुखद धक्का? माझेही तसेच झाले. मलाही असाच सुखद धक्का बसला. नाटकाचे नाव आहे “ढांई अखर प्रेम के”. आता स्वतः जिथे दस्तुरखुद्द माननीय सौ. सुहास जोशी नाटकाच्या दिग्दर्शिका असतील तिथे नाटकाचा दर्जा किती उच्च असेल हे सुज्ञास सांगणे न लगे! हो…हो…मला माहित आहे कि तुम्हालासुद्धा आता ह्या नवीन नाटकाविषयी उत्सुकता लागली असेल पण काळजी करू नका. ह्या लेखाच्या शेवटी आपल्याला सगळ्या उपयुक्त लिंक्स अवश्य मिळतील.


सुजाण मराठी माणूस हा कलेचा नेहमीच भुकेला असतो व गम्मत म्हणजे हि भूक कधीही न भागणारी भूक असते. कितीही दर्जेदार कार्यक्रम आले तरी हि भूक भागत नाही वाढतच जाते. तर ह्या लेखाच्या निमित्ताने “रंगमंच” ह्या ग्रुप ला माझ्या तर्फे व माझ्या वाचकांतर्फे भरभरून शुभेच्छा व “रंगमंच” असेच दर्जेदार कार्यक्रम करत राहोत व आमची भूक वाढत राहो हि सदिच्छा!


वाचकहो आपण आपला बहुमुल्य वेळ दिलात त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. मी अशी आशा करतो की “ढांई अखर प्रेम के” बघित्यावर त्यावर बोलायला तसेच बाकीच्या नाटकांविषयी गप्पागोष्टी करायला आपण येथे पुन्हा भेटूच. नमस्कार.


लेखक : निरंजन गोविंद ओक
आपल्या प्रतिक्रिया खालील इमेल वर अवश्य कळवा. 
email : ngoak_usa@yahoo.com






उपयुक्त लिंक्स