आरक्षण : एका अशक्त देशाचे लक्षण?

 

 
नेहमीचीच शनिवार ची रात्र होती. मुलांना झोपवून मी आणि माझी बायको शांतपणे दिवाणखान्यात येउन बसलो. मुलांना झोपवल्यावर बर्याचवेळा आम्ही असे शांतपणे येउन बसतो. दिवसभर मुलांनी जे काही घर डोक्यावर घेऊन दुमदुमून सोडले असते ते शांत झाल्यावरचा सुखद अनुभव तुम्हाला शब्दात सांगून उपयोगी नाही त्याकरता तुम्हाला तो स्वतःला अनुभवावा लागेल. शनिवार असल्यामुळे आमच्या सौ ना अचानक आईसक्रीम खाण्याचा मूड आला. नशिबाने फ्रीज मध्ये मागच्या आठवड्यातील आंब्याचे आईसक्रीम उरलेले होते त्यामुळे ते बाहेर काढण्यात आले. तुम्हाला म्हणून सांगतो कि आता इथे राहायला येऊन जवळजवळ तेरा वर्षे होऊन गेली तरीपण आपल्या भारतातल्या हापूस आंब्याची चव अजूनही मला व्याकूळ करते. इकडचा अमेरीकेतील आंबा भव्य असला तरी तो चवीच्या बाबतीत दिव्य आहे बर का. शेवटी आमच्या कोकणातला देवगड हापूस तो खरा हापूस. आईसक्रीम चा समाचार घेत घेत आमची चर्चा चालू असताना अचानक आमच्या सौ चा फोन खणखणला. आता एव्हड्या रात्री फोन आला म्हटल्यावर आपल्या मनात उगाचच पाल चुकचुकते हो. खर तर आतापर्यत माझ्या आयुष्यात कधीच काही अघटीत रात्रीच्या वेळेस घडलेले नाही किंवा कोणाच्या बाबतीत तसे घडल्याचा फोन आलेला नाही तरीसुद्ध न चुकता पाल मात्र चुकचुकतेच.

“अग शीतल. तुमचे कोणी सुरत मध्ये राहतात का? जर राहत असतील तर त्यांना काळजी घ्यायला सांग” सौ ची मैत्रीण.

“का ग? काय झालं?” शीतल म्हणजे आमची सौ नी चिंतायुक्त स्वरात विचारले.

“काही नाही ग. मी असे ऐकते आहे कि तिथे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. बर मी फोन ठेवते मला अजून बर्याच जणींना फोन करायचा आहे” अस म्हणून तिले फोन कट केला.

मी सगळे संभाषण ऐकल्यावर कपाळावर हात मारला. अर्धवट माहिती…सगळ अगदी पेर्फेक्ट माहित असेल तरी कधीकधी या बायकांना अर्धवट माहिती द्यायला का आवडते ते मला आजपर्यंत कळलेले नाही. आता आमच्या नशिबाने आमचे तिथे कोणी ओळखीचे राहत नाही पण आता तुम्हीच बघा ह. जरका आमचे तिथे कोणी असते आणि आम्ही त्यांना गडबडीने फोन केला असता तर आम्ही नक्की काय सांगणार होतो त्यांना? कि नुसते घरी बसून राहा म्हणुन. का विचारले तर काय सांगणार कि कारण माहित नाही म्हणून? पण असो त्या फोन मुळे माझी उत्सुकता भलतीच चाळवली गेली. लगेचच मी माझा सेल फोन काढला व इंटरनेट चेक केले. इंटरनेट वर बातमी समजली कि गुजरात मध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे व त्याचे लोण सगळ्या गुजराथ मध्ये वेगानी पसरत आहेत.

आता हे काय नवीन काढले आहे अचानक? असा माझ्या मनात लगेचच प्रन्श्न उपस्थित झाला. आता आरक्षणाच्या मुद्याबद्दल माझे ज्ञान जरा तोकडेच आहे बर का. आरक्षण म्हटले कि मला अलीकडे प्रदर्शित झालेला अमिताभ बच्चन चा “आरक्षण” सिनेमा आठवतो. काय भारी अभिनय केला होता बच्चन साहेबांनी त्या चित्रपटात! पण त्याहून पलीकडे या आरक्षण ह्या विषयावर मी कधीच फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही ह्याची मला अचानक जाणीव झाली व मी खजील झालो. का बर मी ह्या विषयावर विचार नाही केलेला? कारण सापडेना. गरज पडली नाही म्हणून? कि त्यामुळे आपल्याला काही फायदा किंवा तोटा झाला नाही म्हणून? पण काहीका असेना पण हा आरक्षण प्रकार काय आहे तरी काय? हा आला कुठून? आला कुठून म्हणजे ह्याचे मूळ कशामध्ये आहे? कारण प्रत्येक गोष्टीला ह्या जगामध्ये असायला काही तरी कारण हे असतेच ना. मनातली चाळवाचाळव स्वस्थ बसू देईना.

“....आता तू काय म्हणशील यावर?” शीतल चा प्रश्न एखाद्या बाउंसरप्रमाणे अनपेक्षितपणे माझ्यावर येउन आदळला. मी एकदम माझ्या विचारांच्या तंद्रीतून भानावर आलो. शीतल च्या लगेच लक्षात आले कि गेल्या पाच मिनिटांपासून तिने जी काही बोलण्याची एल पी लावली होती ती सगळी माझ्या डोक्यावरून गेलेली आहे म्हणून. ह्या बायका ना, काही काही बाबतीत आणि खासकरून नवर्याच्या बाबतीत फारच हुशार असतात. कुठे धरून ठेवायचे आणि कुठे सोडून द्यायचे हे त्यांना बरोबर माहित असते. आता तिची हीच बडबड तिच्या नवीन कपड्यांबद्दल किंवा नवीन साडी बद्दल असती ना तर तिनी माझी  घसरलेली गाडी बरोबर रुळांवर आणली असती. पण माझ्या नशिबाने तसे न्हवते त्यामुळे मी वाचलो. माझ्या उत्तराची वाट न बघता तिने तिची बोलण्याची तोफ चालूच ठेवली व तिचा मोर्चा आईस्क्रीम कडे वळवला.

नकळत माझी नजर पुन्हा त्या आरक्षणाच्या बातम्यांवर भिरभिरू लागली व मी पुन्हा ह्या आरक्षण नावाच्या विषयाकडे ओढला जाऊ लागलो. खूप पूर्वी मी पेपर मध्ये वाचलेला एक लेख आठवला त्यामध्ये असे लिहिलेले होते कि भारतामध्ये पिढ्यानपिढ्या उच्चवर्णीय समाजाकडून बाकीच्या लोकांची उपेक्षा केली गेली.  त्या लोकांना ज्ञानार्जनापासून वंचित ठेवले गेले.  अश्या लोकांना आता न्याय मिळाला पाहिजे. पिढ्यानपिढ्या ज्ञानार्जनापासून वंचित राहिल्यामुळे त्या समाजातील लोकांना पुन्हा ज्ञानमार्ग जोपासायला किंवा ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात उच्चवर्णीय समाजाबरोबर स्पर्धा करण्यास काही काळ जावा लागेल. तर तो काळ येईपर्यंत त्या पीडित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. त्यानाही ज्ञानार्जनाच्या संधी, गुण कमी मिळून सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून हे आरक्षण! मला तरी या लॉजिक मध्ये काही चूक वाटले नाही. बघाना! जरका एखादा पेहेलवान गडी जो मस्त पैकी रोज कुस्तीचे मैदान गाजवतो आहे ज्याच्या लोखंडासारख्या शरीराची लोकं मुक्तकंठाने प्रशंसा करत आहेत अश्या पेहेलवान गड्याला आपण वर्षभर काहीही व्यायाम न करता नुसते बसविले तर त्याचे काय होईल? व्यायामानी कमावलेले त्याचे शरीर एकदम सुस्त पडून जाईल. छान कमावलेले मसल्स एकदम कमजोर पडून जातील कि नाही? तसेच शेवटी आपला मेंदू सुद्धा एक प्रकारचा मसल्स आहे. पिढ्यानपिढ्या त्याला काम मिळाले नाही त्याची मशागत झाली नाही तर मेंदूचा तो भाग सुस्त पडणारच ना? आता त्याच पेहेलवान गड्याला आपण रोज त्याच्या नेहमीच्या व्यायामाला लावले तर थोड्याच वेळेत तो त्याचे सुस्त पडलेले शरीर एकदम पूर्ववत करेल कि नाही? तसेच आपला हा पिडीत वर्ग एकदाका ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात आला कि हळू हळू ते सुद्धा स्वतःला ह्या क्षेत्रात सिद्ध करतील. त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपल्या समाजात हि जी काही जातींची दरी आहे ती नष्ट होऊन जाईल. सर्वजण समान पातळीला येतील.

पण जरका लॉजिक बरोबर आहे तर मग प्रॉब्लेम काय आहे? आरक्षण ह्या विषयावरून का एव्हडे गुजराथ पेटलेले आहे? थोडक्यात काय हा विषय वाटतो तितका उथळ नसून बराच खोलवर आहे ह्याची मला जाणीव झाली. उद्या नाहीतरी रविवार आहे त्यामुळे उद्या ह्या विषयावर डीप डाएव्ह मारू म्हणजेच खोलवर उडी मारू असे ठरवून मी पलंगावर पडलो.

पलंगावर पडलो तरी मनातून मी काहीसा अस्वस्थच होतो. जेव्हा आपले मन अस्वस्थ असते आपल्या मनात काहीतरी सलत असते तेव्हा आपल्याला फार विचित्र स्वप्ने पडतात नाही? सकाळी उठल्यावर कधी कधी ती स्वप्ने आठवतात तर कधी कधी बिल्कुल आठवत नाहीत. मलासुद्धा असेच एक विचित्र स्वप्न पडले. स्वप्नामध्ये मला मी स्वतःच पण एकदम विचित्र स्वरुपात दिसलो. स्वप्नातल्या मला दोन तोंडे होती. एका तोंडानी मी तावातावाने काही तरी सांगत होतो तर दुसर्या तोंडाने मी अत्यंत शांत व निर्विकारपणे भरलेल्या ताटासमोर बसलेलो होतो. या स्वप्नाचा काय अर्थ होता कोणास ठाऊक. स्वप्ने कशीही असली तरी ती स्वप्नेच असतात आपण त्याच्यावर काही फारसा विचार करत नाही. फार त फार नुसते आश्चर्य व्यक्त करतो आणि आपल्या दिनक्रमाला सुरवात करतो. मी सुद्धा तसेच केले. रविवारी उठल्यावर फ्रेश वगैरे होऊन पहिले माझ्या कॉमप्युटर समोर विराजमान झालो व लगेचच आरक्षणं ह्या विषयावर रिसर्च करायला सुरवात केली. इंटरनेट वर ह्या विषयी बरीच माहिती मिळाली तसेच ह्या विषयी ई-पेपर मध्ये बर्याच बातम्या आल्या होत्या. इंटरनेटवरील ज्ञानामृतावरून आपल्या भारत सरकारने जातींच्या आधारावर आरक्षणाची योजना राबविली आहे असे मला लक्षात आले. व आतापर्यंत फक्त त्याच जाती आरक्षणामध्ये समाविष्ठ  केल्या गेल्या होत्या ज्यांना आतापर्यंत समाजामध्ये मानाचे स्थान नव्हते. ज्यांना हेतुपुरस्सर डावलले गेले होते. त्यामुळे अश्या जातींमधील लोकांना पुन्हा मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी, मग ते शिक्षण असो किंवा सरकारी नोकर्या असोत, हि आरक्षणाची योजना राबवली गेली होती. बाकीच्या बातम्या वाचताना असेहि समजले कि आरक्षणाचा मुद्दा आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून ताजा आहे. कोकणातील व विदर्भातील दिग्गज नेते मराठा, धनगर तसेच मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची मागणी करण्यासाठी दंड थोपटत होते. पण त्यांची वक्तव्ये फार भडक होती. हे दिग्गज नेते आरक्षणाची मागणी करत होते की महाराष्ट्र पुन्हा अक्षरशः पेटवायची भाषा करत होते कोणास ठावून. मला आतापर्यंत राजकारणी लोकांचे मन कधीच जाणून घेता आलेले नाही. ह्या लोकांना खरच त्यांच्या मतदारांविषयी कळकळ असते का? उद्या त्यांना जर त्यांची गादी मतदारांच्या भल्याकरिता सोडायची वेळ आली तर ते तसे करू शकतील का? थोडक्यात हि राजकारणी मंडळी उदात्त हेतूनी राजकारणात आहेत की फक्त राजकारण करण्याकरिता राजकारणात आहेत? बर. राजकारणाचा सोपा अर्थ म्हणजे “राज्य हे कारण” व ते मिळवण्याची धडपड म्हनजेच “राजकारण”. पण राज्य तेव्हाच टिकते जेव्हा राज्यातले लोक सुखी असतात शांत असतात. अशी भडक वक्तव्ये करून महाराष्ट्र पेटवून मिळालेले राज्य किती काळ टिकणार आहे? जळणाऱ्या राज्यातील पेटलेले सिंहासन कोणाला कितीवेळ पेलवणार आहे? हे सगळ वाचून मन अगदी सुन्न झाले! जो तो आपला उठतो आहे आणि आपला नंबर आरक्षणामध्ये लागावा म्हणून धडपड करतो आहे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. आता मराठा समाजाने आपल्या मनगटाच्या ताकदीवर अनेक क्षेत्रात केव्हडे मोठे यश संपादन केले आहे. मी कोल्हापूर येथे माझ्या पदवी शिक्षणाकरिता बरीच वर्षे राहिलेलो आहे व ह्या समाजाने जे घवघवीत यश संपादन केलेले आहे ते बघितलेले आहे. मग त्यांना आरक्षणाची गरज का भासावी? धनगर समाजाचे मी समजू शकतो पण मुस्लिम समाजाचे काय? एकेकाळी ह्या लोकांनीच अख्या भारतावर राज्य केले होते व मुसलमान हा धर्मच वेगळा असल्यामुळे पूर्वीच्या काळी उच्चवर्णीय समाजाने त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे ह्या आरक्षणाच्या मुद्यांमध्ये मुसलमान कुठून आले ह्या मुलभूत प्रश्नाचे उत्तर मला अजूनही कळलेले नाही.  छ्या! विचार करून करून डोक्याचा भुगा होऊ लागला.

तेव्हड्यात एक वेगळाच विचार मनामध्ये चमकला. जरका आरक्षणाचा मुलभूत पाया “एका समाजाने केलेले दुसर्या समाजाचे   शोषण” ह्या भूमिकेवर अवलंबून असेल तर अमेरिकेतील नीग्रो समाजाने ह्याच भूमिकेचा उपयोग का नाही केला? त्यांना तर साधे स्वातंत्र्यहि नव्हते. त्यांच्यावर अनेक पिढ्या गुलामगिरी होती. गुलामगिरीच्या काळात त्यांची अवस्था तर फारच भयानक होती. मग जेव्हा त्यांना स्वातंत्र मिळाले तेव्हा त्यांना आरक्षणाच्या कुबड्या घ्यायची गरज का नाही वाटली? आरक्षण तर सोडाच पण स्वातंत्र मिळाल्यावर अल्पावधीतच त्या लोकांनी सर्व क्षेत्रात मुसंडी मारून घवघवीत यश संपादन केले. इतके यश संपादन केले कि त्यांचाच माणूस आज अमेरिकेचा प्रेसिडेंट देखील झाला. मग आपल्या समाजातील लोकांना या आरक्षणाची भुरळ का पडावी? मुळात आपल्या समाजाचा आरक्षणाविषयी काय दृष्टीकोन आहे? आरक्षण म्हणजे कुबड्या, कि आरक्षण म्हणजे  मिळालेली सुवर्ण संधी? लोकं संधीचे सोने करतात पुढे झेप घेतात आकाशात भरारी घेतात हे पहिले होते. पण मुळात त्या गोष्टीकडे संधी म्हणून बघितले तर ना! त्या गोष्टीकडे कुबड्या किंवा निव्वळ स्वार्थ असे बघितले तर? तो समाज स्वतःचा उत्कर्श करू शकेल? आकाशात भरारी घेईल? माननीय आंबेडकर साहेबांचा आरक्षणाचा जो मूळ हेतू आहे तो साध्य होईल?
आरक्षणाच्या कुबड्यांवर अशक्तपणे उभा राहिलेला भारत देश बघायला आपल्याला आवडेल?
तुम्हीच ठरवा…. अब तुम्हारे हवाले वतन साथीयो.


लेखक : निरंजन गोविंद ओक 
आपल्या प्रतिक्रिया खालील इमेल वर अवश्य कळवा. 
email : ngoak_usa@yahoo.com