ढाई आखर प्रेम का



अखेर तो आला! कीत्येक दिवसांपासून ज्या नाटकाची आतूरतेने वाट पाहत होतो तो सोनियाचा दीवस आला. अगदी बरोबर ओळखले तुम्ही. रंगमंच ह्या ऑस्टिन मधील ग्रुप चे “ढाई आखर प्रेम का” हे हिन्दी भाषेतील नाटक बघण्याचा तो दीवस आला. मनामध्ये बरीच उत्सुकता होती. एकतर रंगमंच ह्या ग्रूपचे नवीन नाटक. त्यात सुप्रसिद्ध माननीय सुहास जोशी ह्यांचे दिग्दर्शन. म्हणजे एकदम “बाप” क्वालिटीचे नाटक बघायला मिळणार ह्या एक्साईटमेंटमूळे माझं मन पॉपकोर्न सारखे फुलून आनंदाच्या उड्या मारत होते. ऑस्टिन येथील हाइड पार्क ह्या ऐतिहासिक नाट्यगृहामध्ये हा प्रयोग होता. वेळेच्या शिस्तीमध्ये पुणेकरांनाही लाजवेल अशी रंगमंच ह्या ग्रूप ची ख्याती असल्यामुळे मीच न्हवे तर माझ्यासारख्या अनेक रसिक प्रेक्षकांनी आधीच येऊन त्यांची त्यांची जागा पटकावलेली होती. अगदी वेळेवर ठरल्याप्रमाणे नाटकाची तिसरी घंटा झाली व “ढाई खर प्रेम का” चा प्रयोग सुरू झाला.
“ढाई खर प्रेम का” हे दोन अंकी हिंदी नाटक आपल्या मराठीतील “प्रेमा तुझा रंग कसा” ह्या नाटकाचा हिंदी अनुवाद आहे. घरच्या साजूक तुपासारख्या शुद्ध सात्त्विक सदाबहार असलेल्या “प्रेमा तुझा रंग कसा” ह्या नाटकाचा आत्मा जसाच्या तसा हिंदी भाषेत ओतून त्याची कलात्मक शुद्धता अबाधित राखण्याची अतुलनीय कामगिरी मा. सुहास जोशी ह्यांच्यातील समर्थ दिग्दर्शकाने  लिलया पेललेली आहे. “प्रेमा तुझा रंग कसा” ह्या गाजलेल्या नाटकाची गोष्ट तुम्हाला माहित असेलच. ती “प्रेमाची” गोष्ट आहे. त्यात “प्रेम” हे न दिसणारे पण प्रमुख पात्र आहे. मग ते प्रेम “पापाजी” आणि “प्रियंवदा“ मधील असो, “बाजा” व “बबली” मधील असो वा “बच्चू“ आणि “मंदा“ मधील असो. पिढ्यानपिढ्या अनेक वेर्षांपासून माणूस प्रेमात पडत आलेला आहे. पण प्रेमाची व्याख्या कधीच बदललेली नाही. प्रथमतः अल्लड अवखळ वाटणारे प्रेम संसारात पडल्यावर आणखी प्रगल्भ होते. संसारातील कटू वास्तवता प्रेमातील गोडीनेच नाहीशी होते. कीत्येक पिढ्या उलटल्या तरी प्रेमाचा रंग त्यातील उत्कटता तशीच राहील. असा काहीसा संदेश देणारे “धाई अखर प्रेम का” हे नाटक रसिक प्रेक्षकांना एक निर्मळ निर्भेळ हसतमुख अनुभव देवून जाते.     


ह्या नाटकामध्ये पापाजी हे प्रमुख पात्र आहे. ते कॉलेज मधील प्रोफेसर असून त्यांनी त्यांच्या उमद्या काळात घरच्यांचा रोश ओढवून लव्ह मेरेज केलेले असते. त्यांची मनाने अजूनही तरुण असलेली प्रेमळ पत्नी प्रियंवदा स्वतःच्या मुलांबाबतीत प्रचंड ओर्थोडोक्स असते. त्यांची तरुण मुले म्हणजे बबली आणि बच्चू. बबलीचे प्रेम एका कोळसेवाल्याच्या मुलाबरोबर म्हणजेच बाजा वर बसते. तर बच्चू प्रेमाचा शोध घेता घेता अखेर मंदा वर लट्टू होतो. इकडे बबली व बाजा आणि तिकडे बच्चू ह्यांची प्रेम प्रकरणे. घरच्यांचा त्याला असलेला विरोध. त्यामूळे उडालेला गोंधळ. व अप्रतिम घेतलेला शेवटचा क्लायमेक्स. अशी नाटकाची भट्टी एकदम मस्त जमलेली आहे.


ह्या नाटकातील मला आवडलेले प्रसंग:
  • नाटकाच्या ओपनिंग सीन मधे पापाजी पुस्तक वाचत दिवाणखान्यात बसले आहेत. त्यांची पत्नी प्रियंवदा मस्त मूड मध्ये “जानेमन जानेमन तेरे दो नयन…” गाणे म्हणत प्रेक्षकांमधून स्टेजवर येते. स्टेजवर दिसणारे दार हा घरामध्ये बाहेरून येण्याचा मार्ग असून प्रेक्षकांची बाजू हा घराचा आतील भाग आहे तसेच मांडलेली पुस्तके, स्टेजचे डिझाईन, “जानेमन जानेमन…” गाणे ह्यावरून हे एक विद्याविभूषित मध्यमवर्गीय कुटूंब आहे हे चटकन ध्यानात येते. प्रेक्षकांची बाजू हा घराचा आतील भाग आहे हे दर्शिविल्याने प्रेक्षकांना आपण प्रेक्षक नसून ह्या मध्यमवर्गीय कुटुंबाचाच एक भाग झाल्यासारखे वाटते.        


  • प्रियंवदा पापाजीना सांगते की तुमचा ह्या घरात काही दरारा नाहीये. माझे वडील जेव्हा आम्हाला बोलवायचे तेव्हा आम्ही घाबरून थरथर कापायचो. पापाजी तेव्हा तिच्याकडे बघून शांतपणे म्हणतो “आपको देखके तो ऐसा नही लगता”. अख्ख थेटर हास्य स्फोटानी दुमदुमून जात. मस्त झाला आहे हा पंच.




  • पापाजीनी त्यांच्या तरुणपणी प्रेमराग चांगलाच आळवला असतो. त्यामुळे त्यांच्या चाणाक्ष नजरेतून बबलीची तगमग सुटत नाही व ते मोठ्या शिताफीने बबली कडून तिच्या प्रियकराचे नाव काढून घेतात. ह्या प्रसंगातून पापाजींचे आपल्या मुलीवर असलेले प्रेम. त्यांचा खेळकर स्वभाव व त्यांचे आपल्या मुलीशी असलेले सुंदर नाते फार छानपणे समोर येते.   


  • “मन करता है पंप लगाकर…”. पंडितजी आपल्या मुलाच्या दिव्य पराक्रमांचा पाढा पापाजींसमोर वाचून दाखवत असतात. आपल्या दिवट्यानी बबली वर लिहिलेल्या कविता वाचून दाखवत असताना हा “पंप” चा पंच एकदम झक्कास जमलेला आहे.




  • ह्या नाटकात अनेक सुंदर फार्सिकल पंच आहेत. त्यातील एक नमूना म्हणजे पंडीतजी जेव्हा रागाने म्हणतात की एकदा दिसूच दे बाजा. मी त्याचे थोबाडच फोडीन. नेमकी तेव्हाच बाजा ची एन्ट्री होते व तो एकदम आवेशाने म्हणतो “मू क्यू…बाबूजी…आप चाहे तो मेरा हृदय फाडके देखलीजीये”. त्यावर पापाजी हळूच प्रियंवदाच्या कानात कुजबुजतात “हमने भी कूच ऐसा ही कहा था ना?”. नाट्यगृहात एकामागोमाग एक हास्याचे नुसते स्फोट होतात.    




  • प्रियंवदा लटक्या रागानी माहेरी जायला निघते तेव्हा प्रियंवदाचा अगदी तोच डाईलोग मारून बबलीची स्वारी परत पापाजींकडे म्हणजे बबलीच्या माहेरी दाखल होते. आता दुसर्या अंकात काय होणार ही उत्सुकता ताणून धरत इथे पहीला अंक संपतो.   


  • ह्या नाटकामध्ये काही गंभीर सीनही आहेत. पापाजी आणि पंडीतजी ह्यांच्या कुटुंबात तणातणी होते तेव्हा बाजा आपल्या वडिलांनाच उद्धटपणे विचारतो की तुम्हाला प्रेमाचा काय अनुभव आहे? तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय?
तेव्हा पंडितजी त्याला सुनावतात की संसार काही पत्त्याचा खेळ नाही. पत्ते कसेही असतील तरी डाव सोडायचा नसतो मग कीतीही त्रास झाला तरी तो सहन करायचा असतो. ह्या गंभीर सीनमुळे थेटर मध्ये काही काळ सन्नाटा पसरतो. पण प्रियंवदा च्या पुढच्या वाक्यांनी “पंडीतजी मैने भी कूच कम नही सहा है” अख्ख्या थेटरमध्ये हास्याची कारंजी उडतात.    




  • स्वतः च्या अहं च जाळ तोडून तू तुझ्या नवर्याकडे परत जा असा सल्ला पापाजी जेव्हा सुशीला ला देतात तेव्हा ती वैतागून म्हणते “मै वापस उनकी शरण मे जाऊ?” तेव्हा पापाजी तिला समजावतात की “शरण” हा शब्द फक्त युद्धात असतो घर गृहस्ती मध्ये नाही.


  • बबली आणि बाजाचे मुल बच्चूमामाचा शर्ट ओला करते. ह्या शुभ शकुनावर पंडीतजी बच्चूला लवकर लग्न होऊन मुल होवूदे असा आशीर्वाद देतात.  





“ढाई खर प्रेम का” ह्या दोन अंकी नाटकाचे पंख लावून वास्तवतेच्या जगापासून दूर एका छान नाट्यानुभवात मी मस्त हरवून गेलो होतो. पण अखेर नाटकाचा प्रयोग संपला. एक छान नितांत सुंदर हवेहवेसे वाटणारे स्वप्न संपून वास्तवतेच्या ह्या जगरुपी पिंजऱ्यात जाग येताना जश्या यातना होतात ना तश्याच यातना हे नाटक संपल्यावर भानावर येताना मला झाल्या. प्रयोग संपल्यावर नाट्यगृहाच्या बाहेर पडलो तेव्हा “खल्लास”, “बाप”, “पैसा डबल वसूल”, “झक्कास” अशी अनेक विशेषणे देऊन रसिक प्रेक्षक भरभरून नाटकाचे कौतुक करताना ऐकले. जणूकाही ते माझ्याच मनातील भावना व्यक्त करत होते. थोड्याच वेळात ह्या नाटकातील कलाकार, स्वतः मा. सुहास जोशी व ह्या नाटकाचे को-डीरेक्टर रोहन जोसेफ प्रेक्षकांशी संवाद साधायला बाहेर आले. भारतामध्ये नाटकातील कलाकारांना नाटक झाल्यावर प्रत्यक्ष भेटण्याची सोय असते की नसते हे मला आठवत नाही पण इथे अमेरिकेत मात्र तुम्हाला सगळ्या कलाकारांना अवश्य भेटायला मिळते. त्यामुळे या नाटकातील कलाकारांना तसेच स्वतः मा. सुहास जोशी यांना  प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली हे विशेष. ह्या सूरेख नाट्यानुभवामुळे मन तर तृप्त झालेच पण विशेष सांगायची गोष्ट म्हणजे ह्या नाटकाच्या इंटर्वल मध्ये रंगमंच च्या आयोजकांनी भारतातील नाट्यगृहामध्ये मिळतात तसे गरम गरम बटाटे वडे व त्याबरोबर मस्त वाफाळणारा चहासुद्धा  ठेवलेला होता त्यामुळे पोटोबासुद्धा तृप्त झाला बर का.


थोडक्यात काय तर नेहमीप्रमाणे यावेळेसही रंगमंच च्या ग्रूपनी रसिक प्रेक्षकांना “ढाई खर प्रेम का” च्या रूपाने एक संपूर्ण नाट्यानुभव दीलेला आहे. ह्या नाटकाचे प्रयोग रंगमंच ग्रुप तुमच्या शहरात घेऊन येणार असेल तर हे नाटक बघण्याची संधी तुम्ही अजिबात सोडू नका. अगदी आजी आजोबांपासून सर्वांना आवडेल असे हे कौटुंबिक नाटक आपण अवश्य बघाच.

लेखक: निरंजन गोविंद ओक

आपल्या प्रतिक्रिया खालील इमेल वर अवश्य कळवा. 
email : ngoak_usa@yahoo.com