रसिकतेच्या चष्म्यातून...



मंडळी, तुमच्यासारखा मी देखील मराठी सिनेमाचा एक रसिक प्रेक्षक आहे बरका!  आता रसिकतेचे म्हणायचे झाले तर ती आपल्या अंतर्मनाच्या एका कोपऱ्यात सुप्तावस्थेत का होईना पण सतत जागृत असते नाही? म्हणूनच एखाद्या गायकाचा छान सूर लागला की लगेच उत्स्फुर्तपणे आपण दाद देतो. एखादा सुंदर चेहरा दिसला कि आपली नजर आपोआप त्या चेहऱ्याकडे वळते. सुंदर फूल आपल्याला चटकन उचलून घ्यावेसे वाटते. गोडं बाळाचे सहजसुंदर हास्य आपल्याला सगळ जग विसरायला लावते. थोडक्यात ह्या रसिकतेमुळे आपल्याभोवती एखादी छान सहजसुंदर गोष्ट घडली की ती आपल्याला चटकन टिपता येते. “एप्रीशियेट” करता येते. सिनेमाचे सुद्धा तसेच असते. जेव्हा आपण सिनेमा बघतो तेव्हा आपण मनाने त्या पात्रांच्या भावविश्वात ओढले जातो. एक रसिक प्रेक्षक म्हणून सिनेमा बघत असताना आपले अंतर्मन बर्याच गोष्टी आपल्या नकळत टीपत असते. काही गोष्टी अंतर्मनाला खटकतात तर काही गोष्टी खूपच आवडतात. सिनेमा संपल्यावर आपले अंतर्मन आतापर्यंत टीपलेल्या सर्व गोष्टींचे क्षणार्धात ऑडीट करते व आपल्या मनाला सिनेमा आवडला की नाही आवडता हा निर्णय पोहोचवते. पण सिनेमाच्या विश्वातून बाहेर पडल्यावर, जगण्याच्या स्पर्धेमध्ये जीवनाच्या वेगामध्ये, आपल्या अंतर्मनानी “एप्रीशियेट” केलेल्या सिनेमातील सर्वच गोष्टी आपल्या स्मरणात राहतील की नाही ह्याची खात्री नसते. आतापर्यंत आपण पाहीलेल्या, आपल्या अंतर्मनानी “एप्रीशियेट” केलेले सिनेमे व त्यातील अश्या सर्व गोष्टी (मग तो एखादा छान प्रसंग असूदे, वाखाणण्याजोगा अभिनय असूदे कींवा इतर काही) स्पष्टपणे मांडून त्या तुमच्यासारख्या रसिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच माझे हे नवीन सदर “रसिकतेच्या चष्म्यातून”. सध्या मराठी सीनेसृष्टी थुई थुई उडणार्या कारंज्याप्रमाणे आपल्यावर नवीन नवीन सिनेमांचा वर्षाव करीत आहे. हा नवीन सिनेमांचा वर्षाव सुखद असला तरी आपण थुई थुई उडणार्या ह्या कारंज्याचे सर्व तुषार वेळेअभावी अनुभवू शकत नाही. तुमच्या आवडीचे सिनेमे “शोर्ट लिस्ट” करून तुमचा बहुमुल्य वेळ वाचविण्यास “रसिकतेच्या चष्म्यातून” हे सदर तुम्हाला नक्कीच कामी येईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. थोडक्यात म्हणायचे झाले तर ज्या प्रमाणे अमेरिकेने तयार केलेली “आयर्न डोम टेक्नोलॉजी” अपायकारक क्षेपणास्त्रांपासून वाचविते त्याच प्रमाणे ह्या सदरांमधील लेखातून विविध मराठी सिनेमांचा घेतलेला वेध तुम्हाला “अरसिक व डोक्यात जाणाऱ्या  सिनेमांपासून” वाचवील अशी मला आशा आहे.   



वेध "डबल सीट" सिनेमाचा






तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, पूर्वी मराठी सिनेमा बघायला जावूयात असे कोणी म्हणाले की वाट्टेल ते कारण काढून मी तेथून पळ काढायचो. कारण त्यावेळचा मराठी सिनेमा फार ग्रामीण स्वरूपाचा असायचा. त्यामधील तमाशा लावणी आणि त्याहूनही कहर म्हणजे ती रडारड अगदी डोक्यात जायची. मी शहरामध्ये वाढलो म्हणून असेल कदाचित, कारण मला माहीत नाही, पण मी अगदी आत्ता आत्तापर्यंत मराठी सिनेमा बघायचे जाम टाळायचो. पण गेल्या काही महिन्यांपासून माझे मराठी सिनेमा विषयी मत पूर्णपणे बदलले. आता चक्क मी मराठी सिनेमा बर्यापैकी फॉलो करायला लागलो आहे. पण अजूनही आपले मराठी निर्माते काही पूर्णपणे सुधारलेले नाहीत. काही काही मराठी सिनेमे अजूनही माझ्या ज्याम डोक्यात जातात. पण "डबल सीट" हा सिनेमा डोक्यात जाणारा नक्कीच नाही. मुंबईतील एका चाळीतल्या सामान्य नोकरीदार माणसाच्या स्ट्रगल विषयीचा थोडासा विनोदी थोडासा गंभीर करणारा हा सिनेमा मला खूप आवडला. ज्याप्रमाणे काही काही माणसे आपल्याला एकदम क्लिक होतात ना त्याप्रमाणेच हा सिनेमा मला एकदम क्लिक झाला. जरका तुम्ही आत्ताचे कींवा पूर्वीचे मुंबैकर असाल कींवा मुंबईचे धकाधकीचे जीवन तुम्ही अनुभवले असेल तर तुम्हालाही हा सिनेमा नक्कीच क्लिक होईल. ह्या कथेच्या मुख्य पात्रामध्ये तुम्ही स्वतःला बघाल. तुम्ही जर परदेशात राहत असाल तर मुंबईचे प्रॉब्लेम तुम्हाला ह्या सिनेमातून चांगल्यापैकी रिलेट करता येतील. सिनेमातील पात्रांचे वागणे बोलणे व काही काही मार्मिक प्रसंग कदाचित तुम्हाला तुमच्या भूतकाळातील आठवणीमध्ये देखील घेऊन जातील. "डबल सीट" सिनेमा तुम्हाला नक्कीच गुंतवून ठेवेल. हा सिनेमा “फील गूड” म्हणजेच “पोझीटिव्ह फिलिंग” देणारा सिनेमा आहे. ह्या सिनेमाची कथा अशी आहे…

कथा सारांश :
अमित नाईक (अंकुश चौधरी) हा टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात चाळीत वाढलेला. मंजिरी (मुक्ता बर्वे) ही कोकणात वाढलेली. गावाकडची मुलगी. लग्नानंतर चांगल्या ऐसपैस घरातून मुंबईतल्या चाळीत थेट दोन खोल्यांमध्ये तिचा संसार सुरू होतो. दोन खोल्यांमध्ये त्याच्याबरोबर अमितचे बाबा (विद्यााधर जोशी) आई (वंदना गुप्ते) आणि एक छोटा भाऊ असे सर्वजण एकत्र राहत असतात. अर्थात सार्या गैरसोयी आणि अडचणींना ती हसत सामोरं जाते. मुंबईची क्रेझ, चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांच्या घराचं वेड, टीव्ही मालिकांमध्ये अडकणारी आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणार्या सुखात आनंद सामावलेली पण त्याच वेळी केवळ घरात न कूढता स्वप्नांच्या पूर्ततेसाठी वेळप्रसंगी ठामपणे उभी राहणारी अशी मंजिरी. अमित तसा चाळीच्या आयुष्यातच अडकलेला. स्वतःच्या मनगटाच्या जोरावर विश्वास नसणारा व नशिबाने साथ दिली नाही म्हणून कुढणारा. पण एका क्षणी त्याच्यातला पुरुषार्थ जागा होतो. त्याला जाणवतं की हे असं कुढत जगण्यात काही अर्थ नाही. आपल्या दोघांसाठी घर हवं, आपलं घर. सुरुवातीला घरी विरोध होतो, संकटं तर कायमच उभी ठाकलेली असतात. पण त्यातून स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्याची धडपड सुरूच राहते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश येत का? शेवट गोड होतो का? बघायला विसरू नका "डबल सीट".


"डबल सीट" चे मला आवडलेले सीन्स  :
  • सिनेमा सुरूच झाल्यावरचे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाचे शॉटस, बेकग्राउंड मधील गाणे. चाळीतील मुलांचे रंगलेले क्रीकेट. अमित आणि मंजिरीची नुकतीच झालेली चाळीतील एन्ट्री व त्याचवेळेस अमितने मंजिरीच्या तोंडावर येणाऱ्या क्रीकेट बॉल चा पकडलेला केच. सुरवात एका छान पंच नी सुरु झालेली आहे.  
  • मंजिरीची चाळीमधील पहीलीच रात्र. झोपल्यावर काहीतरी खुडबुड होते व त्याच्या आवाजांनी ती दचकून उठते. तेव्हा बाजूलाच झोपलेली अमितची आई (वंदना गुप्ते) अगदी शांतपणे तिला म्हणतात “उंदीर असेल. घाबरू नकोस आपला घरातलाच आहे”.
  • अमितच्या चाळीतल्या घरातील बाथरूमची थोडीशी फुटलेली काच. ती दुरुस्त करायला खर्च नको म्हणून त्याला आतून लावलेला पडदा त्यांच्या आर्थिक बिकट परिस्थितीचे सूचक वर्णन करतो .
  • पूर्वी अमित बाहेर बाकड्यावर झोपत असे पण आता लग्न झाल्यावर स्वाभाविकपणे घरात झोपत असतो. एकदा अमित चा मित्र जेव्हा त्या गोष्टीवरून त्याची खेचायला जातो तेव्हा तो स्वतःच तोंडघशी पडतो. अमित जेव्हा त्याला उद्देशून डायलोग मारतो “अंधेरी रात मे दीया तेरे हातमे” तेव्हा तो प्रसंग पांचट न वाटता छान विनोदी वाटतो.   
  • “मी कुठेतरी हरविले आहे…”. मंजिरी प्रथमच मुंबईच्या लोकल ट्रेन मधील प्रवासात हरवते. मस्त जमला आहे हा सीन. मुंबईतल्या नवीन पाहुण्याची मुंबईच्या लोकल ट्रेनच्या प्रवासात कशी भम्भेरी उडते ते फार मस्त दाखविलेले आहे.
  • “आपण ना आपली लेवल वाढवायला पाहिजे…”. मंजिरीच्या तोंडी हे वाक्य इतके मस्त टाकले आहे की तो उपदेश न वाटता एक छान संदेश वाटतो. खरच आपल्याला लहानपणापासून शिकविले गेले असते की आपल्या गरजा कमी केल्या कि आपण आपोआप सुखी होतो. पण सध्याच्या युगात खरेच आपण आपल्या गरजा कमी करू शकतो का? आपल्या सभोवताली जो चंगळवाद चालला असतो त्यात आपल्यालाही उडी घ्यावीशी वाटते पण प्रत्येक वेळेस तो चंगळवाद आपल्याला परवडेल असे नाही. मग त्याला उपाय काय? उपाय एकच की स्वतःची लेवल वाढविणे. स्वतःची कूवत वाढविणे.
 
  • अमित मंजिरी स्वतःचे वेगळे घर बघता आहेत हे कळल्यावर अमितचे बाबा व अमित मधील तणावपूर्ण प्रसंग अगदी अप्रतिम. अंकुश चौधरी आणि विद्यााधर जोशी ह्याच्या अभिनयाला हेट्स ऑफ.     
  • अमितचा मित्र एक प्रामाणिक पोलीस असतो. “मी पैसे खात नाही ह्याच स्पष्टीकरण मला का द्यावं लागतं रे?” ह्या त्याच्या बोचर्या वाक्यातून समाजामध्ये पोलिसांची प्रतिमा किती गढूळ झाली आहे ह्याचा यथार्थ प्रत्यय येतो.    
  • सिनेमाच्या शेवटच्या भागात जेव्हा अमित मंजिरीच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तेव्हा कीतीही भांडण झाले असले तरीही अमितचे बाबा त्याला मदत करायला पूढे सरसावतात. तेव्हा त्यांच्या तोंडचे “…तेरा जनम जितनेके लिये हुवा है. बैठ्नेके लिये नही बेटा” वाक्य ऐकताना आपल्या अंगातले रक्त सळसळून उठते.  
  • सर्वात शेवटी पण तेव्हडेच महत्वाचे म्हणजे ह्या सिनेमातील कलाकारांचा झालेला अत्त्यन्त सुरेख अभिनय. तसेच संपूर्ण सिनेमामध्ये छायाचित्रण, दिग्दर्शन, म्युझिक यांनी गाठलेली बॉलीवूड च्या तोडीसतोड उंची. एकंदरीत ह्या सिनेमाची भट्टी एकदम मस्त जमलेली आहे.  



"डबल सीट" पहावा कि पाहू नये?
  • "डबल सीट" सिनेमा अवश्य पहावा. भारतात असाल तर थेटर मध्ये जाऊन अवश्य पहा. परदेशात असाल तर खालील दिलेल्या वेब साईट वर तुम्हाला विनामुल्य बघता येईल.


तुम्ही अमेरिकेत राहत असाल तर हा सिनेमा तुम्हाला खालील वेब साईट वर विनामूल्य बघता येईल. बाकीच्या देशांमधून ही वेब साईट दीसत असेलही कदाचीत पण ही वेब साईट भारतातून नक्कीच दीसत नाही.  
(टीप १ : खालील वेब साईट भारतामधून दिसत नाही)
(टीप २ : खालील वेब साईटशी माझा कुठलाही संबंध नाही)


ह्या लेखाच्या निमित्ताने सर्व मराठी निर्मात्यांना एक विनंती :
कृपया आपला मराठी सिनेमा यू-ट्यूब अथवा अमेझोन इनस्टंट प्राइम व्हिडीओझ अश्या पेड वेब साईटवर एकाचवेळी प्रदर्शित केल्यास माझ्यासारख्या परदेशी राहणाऱ्या मराठी सिनेमाप्रेमी रसिकांना त्याचा लाभ घेता येईल. कृपया या बद्दल नक्कीच विचार करावा. आपल्याला त्याबद्दल माहिती हवी असल्यास कृपया मला खालील ई-मेल वर कळवावे. मी माहिती मिळवण्याचे आवश्यक ते प्रयत्न नक्कीच करीन. तेवढीच माझी खारीची मदत!
"डबल सीट" ची टीम  :
निर्माते – रणजीत गुगळे आणि अनिश जोग
दिग्दर्शन – समीर विद्वांस
प्रस्तुती – एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमटेड
कथा-पटकथा : क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वांस
संवाद – क्षितिज पटवर्धन
छायालेखन – अर्जुन सरोटे
संकलन – चारू श्री रॉय
संगीत – हृषीकेश, सौरभ, जसराज
गीतकार – स्पृहा जोशी, क्षितिज पटवर्धन आणि समीर विद्वांस
कलाकार – अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे, विद्यााधर जोशी, वंदना गुप्ते, शुभंकर तावडे, संदीप पाठक, आरती वडगबाळकर, पुष्कर श्रोत्री, विकास पाटील


लेखक : निरंजन गोविंद ओक 

आपल्या प्रतिक्रिया खालील इमेल वर अवश्य कळवा. 
email : ngoak_usa@yahoo.com